साला मेव्हण्याकडून एकास मारहाण; आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : न्यायालयीन केस मागे घ्यावी या कारणातून साला मेव्हण्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना महामार्गाच्या सर्व्हीस रोड भागात घडली. या घटनेत मुख्यसंशयीताचा भाऊ जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत कचरू राऊत (३०) व कार्तिक संतोष भावसार (२६ रा.दोघे कपालेश्वर नगर,औरंगाबादरोड) अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे असून याप्रकरणी अमोल कचरू राऊत (२९ रा.गणेश अपा.तपोवन) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अमोल राऊत, त्यांची आई आणि आतेभाऊ सोमवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास पदमा हॉटेल जवळील सर्व्हीस रोडवर गाजरवाडी येथील वडिलोपार्जीत शेत जमिन विक्री बाबत चर्चा करीत असतांना ही घटना घडली. अमोलचा भाऊ संशयीत अभिजीत राऊत आणि त्याचा साला कार्तिक भावसार तेथे आले. संशयीतांनी माडसांगवी मंडळ अधिकारी यांच्याकडे हक्कसोड पत्र केलेली नोंद मागे घे तसेच निकाल मिळण्याबाबतचा अर्ज का केला या कारणातून वाद घातला यावेळी संतप्त साला मेव्हण्याने अमोलला लोखंडी गजाने मारहाण करीत न्यायालयीन केस मागे घे नाही तर तुमचा बेत पाहतो अशी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
सिडकोत तरूणीची आत्महत्या
नाशिक : सिडकोतील उत्तमनगर भागात राहणा-या २० वर्षीय तरूणीने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुमया नाजिम शेख (२० रा.गणेश्वर मंदिराजवळ,शिवपुरी चौक) असे आत्महत्या करणा-या तरूणीचे नाव आहे. सुमया शेख हिने मंगळवारी (दि.१४) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.