औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागात कारमधून सव्वा लाख लांबविले
नाशिक : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधून भामट्यांनी सव्वा लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र नारायण महाजन (६६ रा. संभाजी स्टेडीअम जवळ,अश्विननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महाजन सोमवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे कारमधून (एमएच १५ डीसी ५०४९) प्रवास करीत होते. दत्तमंदिर बस थांबा भागात त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून शेजारी केळी खरेदी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच उघडी असल्याची संधी साधून सिटावर ठेवलेली हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत १ लाख २५ हजार रूपये आणि महत्वाची कागदपत्रे होते. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
कोनार्क नगरला तडीपार जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत सराईत कोनार्क नगर येथील आपल्या घरात मिळून आला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर वसंत सोनवणे (रा.कृष्णा अपा.कोनार्क नगर) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. सोनवणे यास गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर पोलीसांनी गेल्या वर्षी शहर आणि जिह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.१३) तो आपल्या घरातच असल्याचे खब-याने कळविल्याने पोलीसांनी सापळा लावून संशयीतास जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस नाईक विजयकुमार सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.
इंदिरानगरला अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नाशिक : वडाळा पाथर्डी मार्गावरील शिवकॉलनी भागात राहणा-या १३ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सेजल सचिन रामगीरकर (रा.ऋणानुबंध बंगला,जनकल्याण हॉस्पिटल जवळ) असे आत्महत्या करणा-या बालिकेचे नाव आहे. सेजल रामगीरकर या मुलीने सोमवारी (दि.१३) दुपारी आपल्या राहत्या घरीतील बेडरूममधील पंख्यांच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.