इमारतीचा मेन्टेनन्स जमा करण्याच्या वादातू बेदम मारहाण; दोघांना अटक
नाशिक : इमारतीचा मेन्टेनन्स जमा करण्याच्या वादातून दोघा भावांना त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावात घडली. या घटनेत संशयीतांपैकी एकाने कु-हाडीने हल्ला केल्याने एक भाऊ जखमी झाला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दोघा संशयीतांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. गुलाम बाबर शेख (रा.ए ८,म्हाडा वसाहत वडाळागाव) व फिरोज रफिक शेख (रा.श्रमिकनगर,गंजमाळ) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून त्यांचा अनोळखी साथीदार फरार आहे. याप्रकरणी विजय अशोक जाधव (रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.१२) रात्री ही घटना घडली. संशयीतांनी जाधव बंधूना गाठून इमारतीचे दरमहा मेन्टेनन्स जमा करण्याच्या कारणातून वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रसंगी गुलाम शेख या संशयीताने तक्रारदार जाधव यांचे बंधू विकास जाधव यांच्या हातावर कु-हाड मारून जखमी केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
सिडकोत एकाची आत्महत्या
नाशिक : सिडकोतील त्रिमुर्ती चौक परिसरात राहणाºया ३१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ऋषीकेश वासूदेव ईखनकर (रा.पाटीलनगर,त्रिमुर्तीचौक) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. इखनकर याने सोमवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी शिवराज थोरात यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.