लिफ्ट देवून दुचाकीस्वाराने सोनसाखळी लांबविली
नाशिक : लिफ्ट देवून दुचाकीस्वाराने नोकरदार महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचल्याची घटना नागरेमळा भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारूलता अशोक पाटकरी (६२ रा.अश्विन नगर,नवीन सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटकरी या नागरे मळा भागातील अंगणवाडी शाळेचे काम पाहतात. सोमवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास त्या सेवा बजावण्यासाठी नागरेमळा भागात पायी जात असतांना ही घटना घडली. पाटकरी पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना पाथर्डी गावाकडे जाण्याचा मार्ग विचारला. यावेळी पाटकरी यांनी मला ही तिकडेच जायचे असे सांगून लिफ्ट मागितली. सदर दुचाकी स्वाराने त्यांना नागरे मळा भागात सोडले. यावेळी त्याने मित्रास फोन करण्याचा बहाणा केला. पाटकरी या आपल्या पर्स मध्ये मोबाईल ठेवत असतांना भामट्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
बाथरूममध्ये पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : आंघोळ करतांना चक्कर येवून पडल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना लाखलगाव ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. केशव पांडूरंग बर्वे (४४ रा.लाखलगाव ताजि.नाशिक) असे चक्कर येवून पडल्याने मृत्यु झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बर्वे सोमवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत असतांना ही घटना घडली. अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.