कामगाराचा मृत्यु , ठेकेदारावर गुन्हा दाखल
नाशिक : कामगाराच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकामावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने मजूराचा मृत्यु झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश यशवंत जाधव (रा.पवारवाडी,पंचक जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी मृत कामगाराची पत्नी पुष्पा दिनेश पाटील (रा.जयभवानीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेज समोर बंगल्याचे सेंट्रींग काम करीत असतांना दुस-या मजल्यावरून पडल्याने दिनेश भगवान पाटील या कामगाराचा मृत्यु झाला होता. ही घटना २८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. ठेकेदाराने कामगार आणि मजूरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकामावर संरक्षक जाळी,बांबूचा पहाड अथवा भिंत तसेच संरक्षण हेल्मेट,सेफ्टी बेल्ट आदी साहित्य उपलब्ध करून न दिल्याने पतीचा मृत्यु झाल्याचा आरोप मृत कामगाराच्या पत्नीने केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.
…..
त्रिकुटाकडून एकास मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून तीन जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. या घटनेत दगड विटांचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयीतांना अटक केली आहे. कल्पेश वाघ, मुकेश मगर आणि सचिन पुराणे अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल राजेंद्र आहिरे (२२ रा.श्रेया संकुल,जाधव संकुल अशोकनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास स्वप्निल अहिरे आपल्या घरात असतांना कल्पेश वाघ याने त्यास परिसरातील तुळजा भवानी मंदिर भागात बोलावले. अहिरे या ठिकाणी पोहचताच त्रिकुटाने मागील भांडणाची कुरापत काढून त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत दगड विटा फेकून मारण्यात आल्याने अहिरे जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.
…..