समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग; तज्ञास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : चिडचिड होत असल्याने समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत तज्ञास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिपक विजयकुमार मुठाळ (४८ रा.प्रतापसिंग चौक पाथरवट लेन) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटीतील पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलेची नाहक होत होती त्यामुळे तिने समोहन तज्ञांकडे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास महिला नागचौक परिसरातील संशयीताच्या समोहन केंद्रात गेली असता ही घटना घडली. उपचाराचा बहाणा करीत संशयीत मुठाळ याने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.
..
हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून घेतला
नाशिक : अभ्यासिकेतून घराकडे पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून नेल्याची घटना व्ही.एन.नाईक महाविद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी एका संशयीतास अटक केली आहे. मयुर नारायण भुसारे (१९ रा.खुटवडनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी सार्थक अभिमन्यु थोरात (१८ रा.टिळकवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. थोरात २६ ऑगष्ट रोजी केबीटी सर्कल येथील अभ्यासिकेत गेला होता. अभ्यास करून तो आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत जात असतांना व्ही.एन.नाईक कॉलेज परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल चोरून नेला. दरम्यान तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पोलीसांनी एका संशयीतास बेड्या ठोकल्या असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.