नाशिक – जुना आडगाव नाका परिसरात एका अनोळखी इसमाची शुक्रवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलीसांनी अवघ्या १२ तासात आरोपीला तपोवन परिसरातील गार्डनमधून शोधून काढले आहे. या घटनेत दारु पिण्यासाठी २० रुपये दिले नाही म्हणून कटरने वार करुन हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करणार आरोपी पंडीत रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या (३२), असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, ता. त्र्यंबकेश्वर येथील आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव सुनील असून तो गंगाघाटावर राहून बिगारीचे काम करत होता. या दोघांची पू्वी कोणतीही ओळख नसल्याचेही समोर आले आहे.
शुक्रवारी रात्री ही हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली होती. जवळपास १ कि.मी अंतर त्याचा पाठलाग करुन धारधार हत्याराने गळा चिरुन ही हत्या केल्याचे बोलले जात होते. रामरतन लॅाज येथील बंद गाळ्यासमोर हा अनोळखी इसम जखमी अवस्थेत होता. ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी गेले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, येथे त्याचा मृत्य़ू झाला. या युवकाच्या हत्येचे कारण सकाळी समजू शकले नाही. पण, पंचवटी पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीला गजाआड केल्यानंतर त्यांने खूनाची कबूली दिली आहे.