नाशिक – सुवर्ण खरेदी पोटी न वटणारा धनादेश देऊन भामट्याने तब्बल पावणे सहा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप दिलीप बोडके (टाकळीभान श्रीरामपूर ) असे सुवर्ण पेढीस गंडविणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर रोड येथील पीएनजी ब्रदर्स या सुवर्ण पेढीचे व्यवस्थापक नितीन गणपतराव पवार (वय ३२, श्रीगुरुजी हॉस्पीटलमागे काळेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित संदीप बोडके याने १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गंगापूर रोड येथील पीएनजी ब्रदर्स बॉस्को सेंटर पेढीवर ५ लाख ८४ हाजाराचे दागिणे बुक करुन त्या बदल्यात आयडीबीआय बॅकेचा श्रीरामपूर शाखेचा धनादेश दिला होता. त्यानंतर संबधित धनादेश वटला असल्याचे भासवून संशयीताने पावने सहा लाखांचे दागिणे ताब्यात घेउन अपहार केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.