समाजकल्याण कार्यालयातील कोविड सेंटर येथे गोंधळ घालणार्या तोतया पोलीसाला अटक
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करत समाजकल्याण कार्यालय येथील कोविड सेंटर येथे गोंधळ घालणार्या तोतयास मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन दत्तात्रय खरात (रा. काठेगल्ली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी द्वारका जवळील समाजकल्याण कार्यालय येथे कार्यरत असलेल्या कोवीड केअर सेंटर येथे खरात हा नातेवाईकास डबा देण्यासाठी म्हणुन आला होता. या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी तसेच उपचारांसाठी आलेल्या रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असतानाही खरात याने कोवीड सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले असता त्याने आपण मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगीतले. तसेच बनावट ओळखपत्र दाखवून सुरक्षा रक्षकांशी वाद घातले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीसांना माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांनी तेथे धाव घेऊन सबंधीताची चौकशी केली असता त्याचा बनाव उघडकीस आला. त्या अटक करण्यात आली असून त्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोविड केअर सेंटर येथे रूग्णास भेटणे अगर बाहेरील कोणतीही वस्तु देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
…..
पुजारीच्या घरावर दगडफेक
नाशिक : काळाराम मंदिराच्या पुजारीच्या घरावर अज्ञात दुचाकीस्वार समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि.६) रात्री घडली. यापूर्वीही याच पुजा-याचे वाहन फोडण्यात आले होते. सदर समाजकंटक पोलीसांच्या हाती लागलेले नसतांना ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश अरविंद पुजारी (४७) रा. रामराज्य संकुल, काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पुजारी यांचे कुटुंबिय घरात असतांना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. परिसरातील नागरीकांनी धाव घेताच समाजकंटक पसार झाले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुजारी यांची घरासमोर पार्क केलेली कार समाजकंटकांनी फोडली होती. या गुह्यातील संशयीत पोलीसांच्या हाती लागलेले नसतांना ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अधिक तपास उपनिरिक्षक वाय.एस. माळी करत आहेत.