एटीएम कार्डची आदलाबदल ; ४० हजार रूपयांची रोकड केली लंपास
नाशिक : एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्याने वृध्दाच्या खात्यातील ४० हजार रूपयांची रोकड परस्पर लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मदतीचा बहाणा करून ही रक्कम लांबविण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद सखाराम ढोमसे (७० रा.दसक,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ढोमसे बुधवारी (दि.८) जेलरोड परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम बुथवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी पैसे काढून देण्याचा बहाणा करून भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड हातोहात लांबविले. यानंतर त्याने सायखेडारोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमधून परस्पर चाळीस हजार रूपये काढून घेतले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
बाल निरीक्षण गृहातील सुमपदेशन केंद्रात चोरी
नाशिक : उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहातील सुमपदेशन केंद्राचा कडीकोयंडा तोडून चोरट्यानी पंख्यासह दोन सायकली आणि लोखंडी साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.८) सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र राजेंद्र घेगडमल (रा.स्वारबाबानगर,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृह आवारातील समुपदेशन कक्षाचे पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ही चोरी केली. समुपदेशन कक्षात शिरलेल्या चोरट्यांनी पंखे,दोन सायकली, लोखंडी पलंग – बाकडे,जुना बंब शिडी असा सुमारे २२ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.