सय्यद पिप्री : ओझर पिप्री शिवारातील दगड खाणीतील पाण्यात पित्यासह दोन पुत्रांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात आढळून आलेल्या दुचाकीवरून मृतांची ओळख पटली असून बापलेकांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ओझर पिंप्री शिवारातील गट नं १६२१ मधील दगड खाणीतील पाण्यात बुधवारी (दि.८) शंकर गुलाब महाजन (३४ मुळ रा. यावल जि. जळगाव, हल्ली डांबरवाडी, भगतसिंग नगर ओझर ) व पृथ्वी आणि प्रगती या तीन वर्षीय जुळया मुलांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात जुळ्या मुलांसह एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याने पोलीस पाटील कैलास ढिकले यांनी तात्काळ नाशिक तालूका पोलीसांशी संपर्क साधला होता. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली असता खानीजवळ उभ्या असलेल्या बेवारस मोटारसायकलवरून मृतांची ओळख पटली. महाजन दोन दिवसांपूर्वी आपल्या जुळया मुलांना घेवून घराबाहेर पडल्याचे समजते. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून बापलेकांच्या मृतदेहाने एकच खळबळ उडाली आहे. संबधीतांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.