नाशिक – नाशिकच्या गंगापुर रोड या उच्चभ्रू भागात एक भोंदू ज्योतीषी सर्व समस्यांवर उपचार करून लाखो रूपये उकळत होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आम आदमी पार्टी यांनी रचलेल्या सापळ्यात हा भोंदू पकडला गेला. गंगापुर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्यास अटक केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते. सविस्तर माहिती अशी की गंगापुर रोडच्या जेहान सर्कल येथे एक भोंदू ज्योतीषी गणेश महाराज याने भाड्याचे कार्यालय घेतले होते. अनेक दिवसांपासून तो त्या ठिकाणी राहुन लोकांना फसवत होता. ‘असा कोणताही मनुष्य नाही की त्याला समस्या नाही व अशी कोणतीही समस्या नाही की तिला उत्तर नाही’ , असा दावा असलेले पत्रक त्याने संपूर्ण शहरात वाटले होते. लोकांच्या श्रध्देचा फायदा घेत तो अघोरी उपचार सांगत लाखो रूपये लुटत होता. ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर आम आदमी पार्टी सोबत सापळा रचला. त्यात बनावट जोडपे भोंदूबाबाकडे पाठवले. मुल होत नसल्याची तक्रार भोंदूबाबाला सांगितल्या नंतर त्याने अघोरी पुजाविधी करण्यास सांगितले. त्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली. पतीला बाहेर पाठविल्यानंतर बनावट पीडित महिलेचा हात हातात धरला व पाठीवर, मांडीवर हात फिरवला. नंतर सदर पीडित जोडप्याने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गंगापुर पोलीस ठाणे गाठले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या बाबत निवेदन दिले. पोलीसांनी गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेऊन भोंदूबाबास अटक केली. जादूटोणा विरोधी कायद्याचे ३/२ भा द वि ३५४ चा आधार घेऊन रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात येत होता.
या बाबत बोलतांना कार्यकर्त्यांनी असे सांगीतले की हा भोंदूबाबा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील असून यांची हाय प्रोफाईल टोळी आहे. उच्च प्रतिचे वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहीराती देऊन फसविणे असे कामे तो करतो. देशभर हा फिरत असतो. नाव व मोबाईल नंबर बदलून त्यांचे फसवणूक करण्याचे काम चालू असते. या बाबत कुणाची फसवणूक झाली असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत डॅा. टी.आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, अॅड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे ,जितेंद्र भावे, कस्तुरी आटवणे, जगदीश आटवणे, सोमा कुर्हाडे,राजेंद्र गायधनी,प्रतिक पवार आदींनी सहभाग नोंदवला.