पूर्व वैमनस्यातून त्रिकुटाने १८ वर्षीय तरूणावर कोयत्याने हल्ला
नाशिक : पूर्व वैमनस्यातून त्रिकुटाने १८ वर्षीय तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना विहीत गाव येथे घडली. या घटनेत जखमी तरूणाच्या भावासही शिवीगाळ करीत धमकी दिली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपम क्षिरसागर व त्याचे दोन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दर्शन शरद हांडोरे (१८ रा.हांडोरे मळा,) या जखमी युवकाने तक्रार दाखल केली आहे. दर्शन हांडोरे सोमवारी (दि.६) पोळया निमित्त निघालेल्या हांडोरे मळ्यातील बैलांच्या मिरवणुकी सोबत विहीतगाव येथे गेला होता. मारूती मंदिराजवळ बैलांची मिरवणुक सुरू असतांना दुचाकीवर ट्रिपलसीट आलेल्या क्षिरसागर व त्याच्या दोन साथीदार यांनी टिकटॉक व्हिडीओ बनविण्याच्या वादातून शिवीगाळ करीत त्यास मारहाण केली. यावेळी क्षिरसागर याने कमरेला लावलेला धारदार कोयता काढून हांडोरे यांच्या डोक्यात मारला. या घटनेत हांडोरे जखमी झाला असून, घटनेप्रसंगी दर्शनचा भाऊ वैभव हांडोरे हा त्याच्या मदतीला धावून आला असता संशयीतांनी त्यास शिवीगाळ करीत धमकाविल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
भाजीपाला व्यावसायीकास मारहाण
नाशिक : गणपती स्टॉल धारकांकडे पैश्यांची मागणी करतो या कारणातून भाजीपाला व्यावसायीकास एकाने बेदम मारहाण केल्याची घटना मखमलाबादनाका भागात घडली. या घटनेत दगडी फरचीचा तुकडा मारून फेकल्याने व्यावसायीक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अशोक मुर्तडक (रा.मखमलाबाद नाक्या जवळ) असे मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत किसन आहेर (३१ रा.शिंदेनगर,मखमलाबाद रोड) यांने तक्रार दाखल केली आहे. आहेर भाजीपाला व्यवसाय करतो. रविवारी (दि.५) रात्री तो मखमलाबाद नाका येथील मारूती मंदिरा जवळील उदय आर्ट या ग्लोसाईन दुकानासमोरू जात असतांना मुर्तडक यांनी त्यास गाठून मारहाण केली. मखमलाबाद नाका भागातील गणपती स्टॉल धारकांकडून पैसे मागतो या कारणातून वाद घालत मुर्तडक यांनी शिवीगाळ करीत त्यास मारहाण केली. या घटनेत मुर्तडक यांनी दगडी फरचीचा तुकडा फेकून मारल्याने आहेर जखमी झाला असून संशयीताने पुन्हा या भागात दिसलास तर संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.