कोविड रूग्णालयात दोन महिला कर्मचा-यांचा विनयभंग, चौघांना अटक
नाशिक : बालकामगार असल्याची कुरापत काढून कोविड रूग्णालयात धुडघूस घालत दोन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याची घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. योगेश दिलीप पाटील (२६), सुनिल बबन सदगिर (२४, रा.दोघे सिंहस्थनगर,सिडको), सुजय प्रकाश कुमावत (२५,रा. शिवाजीनगर, सातपूर) व विशाल बापु जाधव (२६, रा. बदलापूर, ठाणे) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दवाखान्यात कर्मचारी असलेल्या एका महिलेनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार उपेंद्रनगर येथील साई सेवा हॉस्पिटल येथे ही घटना घडली. सदर हॉस्पिटल मध्ये कोविड रूग्णांवर उपचार केले जातात. गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास चौघे रूग्णालयात आले होते. संशयीतांनी बळजबरीने डॉ. सोमानी यांच्या कॅबिनमध्ये शिरून रूग्णालयात बालकामगार काम करीत असल्याची कुरापत काढून गोंधळ घातला. यावेळी तक्रारदार महिला आणि महिला वॉचमन यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता विनामास्क असलेल्या टोळक्याने दोन्ही महिलांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
……