महिलेचा विनयभंग एकास अटक; तिडके नगर भागातील घटना
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित एकाने विनयभंग केल्याची घटना तिडके नगर भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. बाळू किसन खानझोडे (रा.क्रांतीनगर,उंटवाडीरोड) असे अटक केलल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास महिला तिडके नगर येथील रॉयल वॉशिंग सेंटर समोरून पायी जात असतांना संशयीताने तिची वाट अडवित विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
…..
भाजीपाला खरेदी करतांना मोबाईल चोरी
नाशिक : भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी एका ग्राहकाच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविल्याची घटना मार्केट यार्डात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल बाळकृष्ण कोते (रा.आरटओ समोर पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कोते रविवारी (दि.५) भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डात गेले होते. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या खिशातील ११ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक कुलकर्णी करीत आहेत.
शिवाजीनगरला एकाची आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या ४५ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुबोध सुधाकर विभांडीक (रा.नयनतारा रो हाऊस, शिवाजीनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. विभांडीक यांनी रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या संकल्प हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.