किरकोळ कारणातून दांम्पत्यास मारहाण; पेव्हर ब्लॉक फेकून मारल्याने एक जण जखमी
नाशिक : मुलांच्या भांडणाची कुरापत काढून शेजा-यांनी दांम्पत्यास मारहाण केल्याची घटना सिडकोतील खोडेमळा भागात घडली. या घटनेत सिमेंट कॉक्रीटचा पेव्हर ब्लॉक फेकून मारल्याने एक जण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण ससाणे व निशा ससाणे अशी दांम्पत्यास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन रमेश चव्हाण (रा. मंगलमुर्ती हाईटस,खोडेमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि संशयीत एकाच सोसायटीत राहणारे असून किरकोळ कारणातून ही घटना घडली. लहान मुलांच्या भांडणाची कुरापत काढून शनिवारी (दि.४) दोन्ही कुटूंबात वाद झाला होता. यावेळी संतप्त ससाणे यांनी चव्हाण यांना पेव्हर ब्लॉक मारून फेकला तर ससाणे यांच्या पत्नीने चव्हाण यांच्या पत्नीस बेदम मारहाण केली. या घटनेत चव्हाण जखमी झाले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तीन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गंगापूर,उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिपक सुरेश हिरे (रा.अहिल्याबाई होळकर चौक ,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हिरे यांची डिस्कव्हर एमएच ४१ क्यू ९४९५ गेल्या ३० ऑगष्ट रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत. दुसरी घटना जयभवानी रोड भागात घडली. इम्तीयाज अली रशिद शेख (रा.आडकेनगर) यांची पल्सर एमएच १५ एफए ७८६३ गेल्या १९ ऑगष्ट रोजी त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत. तर अंबड गावातील चेतन साहेबराव निकम (रा.सोहम रेसि.अंबड) यांची पल्सर एमएच १५ एफएस ०९४३ शुक्रवारी (दि.३) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.