नाशिक : दांम्पत्य शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत चोरट्यांनी घर फोडून दहा हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना गणराज कॉलनीत घडली. भरदिवसा झालेली ही घरफोडी पाळत ठेवून करण्यात आल्याचे बोलले जात असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण गोविंद चंद्रात्रे (रा.सत्यम संगम हौ.सोसा.गणराज कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चंद्रात्रे दांम्पत्य शुक्रवारी (दि.३) सकाळच्या सुमारास शतपावलीसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून रोकड, दागिणे व पासपोर्ट असा सुमारे २ लाख ९३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पाळत ठेवून केल्याचे बोलले जात असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.