पत्नीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून घरात घुसून युवकावर प्राणघातक हल्ला
नाशिक : पत्नीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून टोळक्याने घरात घुसून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गंगापूररोडवरील प्रमोद महाजन गार्डन भागात घडली. या घटनेत धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय तिडके आणि त्याचे दोन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल शहाजी निखाडे (२२ रा.ओम शुभम अपा.इंद्रप्रस्थ हॉल मागे) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निखाडे गुरूवारी (दि.२) रात्री आपल्या रूममध्ये असतांना तिघा संशयीतांनी त्याच्या रूमवर जावून हा हल्ला केला. घरात घुसलेल्या त्रिकुटाने तिडके यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार केला. हा हल्ला अनैतिक संबधातून झाल्याचे बोलले जात असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पत्की करीत आहेत.
सामनगावला पिस्तूलधारी गजाआड
नाशिक : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाºयास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयीताने पिस्तूल कोठून व कश्यासाठी आणला याबाबत पोलीस शोध घेत असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश अशोक जाधव (२५ रा.म्हाडा बिल्डींग नं.२,अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) असे अटक केलेल्या पिस्तूलधारीचे नाव आहे. जितेश जाधव याच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती खब-यांकडून पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.३) त्याच्या घर परिसरात सापळा लावण्यात आला होता. संशयीत घरात असल्याची चाहूल लागताच पोलीसांनी त्याच्यावर झडप घालून जेरबंद केले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे मिळून आले असून त्याने पिस्तूल कोठून व कश्यासाठी आणले याबाबत तपास सुरू आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
…..