गांजा मळून न दिल्याने मारहाण
नाशिक : गांजा हा अमली पदार्थ मळून न दिल्याने त्रिकुटाने युवकास बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना गंगाघाटावर घडली. या घटनेत युवकाच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किन्ना व त्याचे दोन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल सुरेश बोडके (२३ रा.गौरी पटांगण झोपडपट्टी,गंगाघाट) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. बोडके गुरूवारी (दि.२) रात्री गौरी पटांगण येथील सार्वजनिक शौचालय भागात गेला असता ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना शौचालयाजवळ बसलेल्या त्रिकुटाने त्यास आवाज देवून बोलावून घेत गांजा मळून देण्यासाठी आग्रह धरला. यावेळी बोडके यांने नकार दिला असता त्रिकुटाने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी किन्ना नामक तरूणाने बोडके यास दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक फुलपगारे करीत आहेत.
तडीपार ऋषीकेश राजगिरे जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने तडीपारांचा शहरातील वावर चर्चेत आला आहे. ऋषीकेश अशोक राजगिरे (२० रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. ऋषीकेश राजगिरे याच्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्यास गेल्या वर्षी हद्दपार केले आहे. शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी त्याच्याविरूध्द हद्दपार कारवाई केलेली असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.३) तो चुंचाळे येथील मनपा शाळा भागात आला असता पोलीसांच्या जाळयात अडकला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय सपकाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.