नाशिक – उपनगर पोलिस ठाणे हद्दीत रिक्षा आणि मोबाईल चोरी करणाऱ्या फिरस्त्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील चौकशीसाठी संशयिताचा ताबा उपनगर पोलिसांकडे देण्यात आला. कुणाल लक्ष्मण पाटील (३२, रा. फिरस्ता, मूळ रा. दुसरा बसस्टॉप, गोपालनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चोरी करून मिळणाऱ्या पैशांमध्ये वेगवेगळी शहरे हा संशयित फिरतो. काही कालावधीपूर्वी त्याने उपनगर पोलिस ठाणे हद्दीत एक रिक्षाची आणि मोबाईलची चोरी केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा समांतर युनीटचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. याच दरम्यान युनिटचे हवालदार शंकर काळे यांना संशयित आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शामराव भोसले, हवालदार शंकर काळे, बाळू शेळके, यशवंत बेंडकुळी, संतोष ठाकुर, पोलिस शिपाई प्रकाश पवार आदींनी सातपूर गावातील बस स्टॉप येथून संशयित पाटील यास बेड्या ठोकल्यात. त्याने उपनगर हद्दीतून रिक्षा व मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी येवला येथून चोरीची रिक्षा व मोबाईल हसतगत केला. संशयितास पुढील चौकशीसाठी उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी हा फिरस्ता असून, त्याला वेळेवर अटक करणे महत्त्वाचे होते.