महिलेस पावणेबारा लाखांचा गंडा
नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून पावणे बारा लाख रुपये ऑनलाईन लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महिलेस बोलण्यात गुंतवून भामट्यांनी बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवित हा गंडा घातला असून त्यांनी बचत खात्यासह मुदत ठेव रक्कमेवर परस्पर कर्ज काढून रक्कम लांबविली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी छबीलदास मंडलिक (४७, रा.बळवंतनगर, आनंदवली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार मंडलीक यांना ३० जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला होता. एसबीआय बँके खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाणा करून भामट्यांने त्यांना मोबाईलवर आलेल्या मॅसेजवर गोपनिय माहिती भरण्यास भाग पाडले. या आधारे मंडलीक यांच्या बँक खात्यातील बचतीची रक्कम काढून घेतली. तसेच त्यांच्या मुदत ठेव गुतंवणुकीवर परस्पर लाखो रूपयांचे कर्ज मंजुर करून घेत तब्बल ११ लाख ७३ हजार ९९९ रुपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरिक्षक श्रीपाद परोपकारी करत आहेत.
…..