शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तरूणाने केला विनयभंग
नाशिक : शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तरूणाने विनयभंग केल्याची घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. सुरज श्याम कदम (२४) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे. अल्पवयीन पीडिता गुरूवारी (दि.२) वडिलांची दुचाकी घेवून शिकवणीसाठी जात असतांना ही घटना घडली. देवळाली गाव राजवाडा मार्गे ती आनंदऋषी शाळेच्या दिशेने शिकवणीसाठी जात असतांना संशयीताने तिचा पाठलाग केला. राजवाडा येथे आवाज देवून मुलीची दुचाकी अडवीत त्याने हे कृत्य केले. दुचाकीवर असलेल्या मुलीस माझ्याशी लफडे करते का असे म्हणून त्याने विनयभंग केला. यावेळी त्याने धमकावल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले असून अधिक तपास महिला उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीत राहणा-या ४७ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संजय राम पाटील (रा.घर नं.बी ७८ राज्य कर्म.सोसा.) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. पाटील यांनी गुरूवारी (दि.२) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब कुटूंबियांच्या निदर्शनास येताच भाऊ संजय पाटील यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
स्टोव्हच्या भडक्याने एकाचा मृत्यू
नाशिक : स्वयंपाक करण्यासाठी स्टोव्ह पेटवित असतांना अचानक भडका उडाल्याने ३५ वर्षीय इसम ठार झाला ही घटना औरंगाबादरोड भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विलास पांडू रेनझड (रा.जेजूरकर मळा) असे भाजल्याने मृत्यु झालेल्या इसमाचे नाव आहे. रेनझड हा गेल्या मंगळवारी (दि.३१) रात्री आपल्या घरात स्वयंपाक करण्यासाठी स्टोव्ह पेटवित असतांना ही घटना घडली. अचानक भडका उडाल्याने तो गंभीर भाजला होता. त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
…..