रिक्षाचालकासह एकाने प्रवाशास केली मारहाण; ३१ हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतले
नाशिक : रिक्षाचालकासह एकाने प्रवाशास मारहाण करीत लुटल्याची घटना मुक्तीधाम समोरील मार्गावर घडली. या घटनेत रोकडसह मोबाईल आणि प्रवाश्याचे साहित्य असा सुमारे ३१ हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत भामट्यांनी पोबारा केला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिलक तिरूमणी (रा.तामीळनाडू हल्ली गायत्री रेसि.टागोरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिरूमणी मंगळवारी (दि.३१) नाशिकरोड रेल्वेस्थानक ते टागोरनगर असा रिक्षा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. रेल्वेस्थानक परिसरातून ते एका अॅटोरिक्षात बसले होते. यावेळी एक सहप्रवासीही रिक्षात बसलेला होता. मुक्तीधाम समोर रिक्षा पोहचताच शेजारी बसलेल्या सहप्रवाशांने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी चालकाने आपले वाहन थांबवून तिरूमणी या प्रवाशास रिक्षाखाली खेचत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी दोघा भामट्यांनी तिरूमणी यांच्या खिशातील ५०० रूपयांची रोकड आणि मोबाईल तसेच बॅग हिसकावून पोबारा केला. या बॅगेत मशनरी आणि टुल्स किट असा सुमारे ३० हजार ५०० रुपए किमतीचा ऐवज होता. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
…
चक्कर येवून पडल्याने वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मृत्यु
नाशिक : शहरात चक्कर येवून पडल्याने मृत्युचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मंगळवारी (दि.३१) मृत्यु झाला. त्यात ४७ वर्षीय व्यक्तीसह एका ८० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शाम शर्मा (८० रा.मोंढे मळा,पाथर्डी फाटा) हे वृध्द मंगळवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून जमिननीवर कोसळले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. लक्ष्मण ढारकरगे (४७ रा.साई कॉलनी,जगतापमळा) हे दुपारच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.