शहरात चेनस्नॅचरसह मोबाईल हिसकावून नेणा-यांचा धुमाकूळ; वेगवेगळया ठिकाणी दोन घटना
नाशिक : शहरात चेनस्नॅचरसह मोबाईल हिसकावून नेणा-यांचा धुमाकूळ सुरू असून, दुचाकीस्वार भामटे मोबाईलवर बोलणा-या व रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळय़ातील अलंकार हिसकावून नेत आहेत. जबरीचोरी करणा-या भामट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत असून, नुकत्याच वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये दुचाकीस्वारांनी पादचारी महिलेच्या गळय़ातील मंगळसुत्र आणि शतपावली करणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई रामचंद्र जोपळे (६५ रा.वाढणे कॉलनी, बोरगड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, श्रावणी सोमवार (दि.३०) निमित्त त्या गोदा घाटावर गेल्या होत्या. दुपारी देवदर्शन आटोपून घरी जाण्यासाठी मालेगाव स्टॅण्डच्या दिशेने त्या पायी जात असतांना ही घटना घडली. कपालेश्वर मंदिराकडून खांदवे सभागृह मार्गे त्या मालेगाव स्टॅण्डकडे पायी जात असतांना ऋणानुबंध हॉल समोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना तपोवन रोडवर घडली. काठेगल्लीतील राजेंद्र उत्तमराव कराड (५६ रा.वात्सल्य सोसा.गणेशनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कराड गेल्या शनिवारी (दि.२८) रात्री जेवण आटोपून तपोवनरोड भागात शतपावली करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. मेट्रो मॉल भागात ते मोबाईलवर बोलत शतपावली करीत असतांना अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
नळ कनेक्शन जोडणीच्या वादातून शेजा-यास बेदम मारहाण
नाशिक : सामुहिक भिंतीलगत नळ कनेक्शन जोडणी करण्याच्या वादातून एकाने आपल्या शेजा-यास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम थोरात (रा.शिवाजीनगर) असे शेजाºयास मारहाण करणाºया संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी मानिक गजेराम कोल्हे (रा.धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार एकमेकांचे शेजारी असून दोघांच्या घरामध्ये सामुहिक भिंत आहे. कोल्हे यांनी घराबाहेर सामुहिक भिंतीला लागून नळ कनेक्शन घेतल्याने हा वाद झाला. सोमवारी (दि.३०) कोल्हे नळ कनेक्शनची जोडणी करीत असतांना संशयीताने त्यास विरोध केला. भविष्यात मला घराचे बांधकाम करायचे आहे त्यामुळे भिंतीला लागून नळ जोडू नका असे म्हणत त्याने वाद घातला. यावेळी कोल्हे त्यास समजून सांगत असतांना संतप्त झालेल्या थोरात याने शिवीगाळ करीत जमिनीवर पडलेला दगड कोल्हे यांना मारून फेकला. या घटनेत कोल्हे यांचे डोके फुटले असून अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
…