खेळता खेळता तीस-या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यु
नाशिक : खेळता खेळता तीस-या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना के. जी. मेहता शाळा भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. युवेन प्रतिक मोकशी (२ वर्ष रा.लोटस अपा.गार्डन इस्टेट) असे तिस-या मजल्यावरून पडल्याने मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. युवेन मोकशी रविवारी (दि.२९) रात्री आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत असतांना ही घटना घडली. तिस-या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असतांना अचानक तो जमिनीवर कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.३०) आपआपल्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दोघा व्यक्तींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुरेश पोपट पवार (५० रा.श्यामवंदन अपा.राहूल हॉटेल जवळ मखमलाबाद) यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. दुसरी घटना रेल्वे ट्रॅक्शन भागात घडली. शब्बीर मुनीर शेख (५२ रा.संभीजानगर, एकलहरारोड) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.