अपघातात दोन ठार
नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले. त्यात दुचाकीस्वारासह कार चालकाचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल विलास परदेशी (रा.कुसूंबा ता.जि.नाशिक) या दुचाकीस्वाराचा महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यु झाला. परदेशी आणि शिवदास सुभाष परदेशी (२३ रा.सदर) हे दोघे मित्र बुधवारी (दि.५) एमएच ०५ इजी १५२५ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. स्वामी नारायण मंदिरासमोरील उड्डाणपूलावरून ते प्रवास करीत असतांना भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर जावून आदळली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राहूल परदेशी यांचा मृत्यु झाला. तर त्यांचा मित्र श्शिवदास परदेशाी जखमी झाला असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत. दुसरा अपघात औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर येथे झाला. या अपघातात भरधाव कारचे पुढील चाक फुटल्याने कार पलटी होवून कारचालक आकाश दिपक चंदीले (२७ रा. तोफखाना,दिल्ली गेट अहमदनगर) ठार झाला. या अपघातात कारमधील गौरव विकास सावंत,अमोल अरूण सोनवणे (रा.सदर) हे दोघे जखमी झाले. अहमदनगर येथील तिघे मित्र मंगळवारी (दि.४) मध्यरात्री स्विफ्ट कार एमएच १२ आरएन ७४४९ मधून एक्स्लो पॉईंट कडून सातपुरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. तिघे मित्र संजीव नगर येथील इंडस्ट्रीयल वजन काट्यासमोरून प्रवास करीत असतांना अचानक भरधाव वेगातील कारचे चालकाच्या बाजूचे टायर फु टले. या अपघातात कारने तिन पलट्या घेतल्याने चालकाचा मृत्यु झाला तर दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी हवालदार रमेश टोपले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.
…..