८१ हजार ६२० रूपयांचा गुटखा आणि सॅन्ट्रो कार जप्त
नाशिक : राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री,निर्मिती आणि वाहतूकीस बंदी असतांना राजरोसपणे कारमधून गुटखा विक्री करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईत कारसह गुटखा असा सुमारे २ लाख ३१ हजार ६२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुसूदन देविदास चौधरी (रा.सोमवार बाजार,देवळालीगाव) असे अटक केलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. संशयीत सोमवार बाजारात बेकायदा गुटखा विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि. २९) पोलीस पथकास सोबत घेवून सापळा लावला असता चौधरी सॅन्ट्रो कारमध्ये (एमएच १५ एएस १७११) गुटखा विक्री करतांना मिळून आला. संशयीताच्या ताब्याच्या ताब्यातून सात गोण्या हिरा पानमसाला व रॉयल ७१७ सुगंधी तंबाखू असा ८१ हजार ६२० रूपयांचा गुटखा आणि सॅन्ट्रो कार असा सुमारे २ लाख ३१ हजार ६२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
भाजलेल्या ९ वर्षीय मुलीचा मृत्यु
नाशिक : देवा-यातील पेटता दिवा कपड्यांना लागल्याने भाजलेल्या ९ वर्षीय मुलीचा मृत्यु झाला. ही घटना वृंदावन नगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आर्या विनोद यादव (रा.साई रो हाऊस,जत्रा हॉटेलमागे वृंदावननगर) असे भाजल्याने मृत्यु झालेल्या बालिकेचे नाव आहे. आर्या चार महिन्यांपूर्वी आपल्या घरात भाजली होती. देवघरात खेळत असतांना देवा-यातील पेटता दिवा तिच्या फ्रॉकला लागल्याने कपड्यांनी पेट घेतला होता. या घटनेत ती गंभीर भाजली होती. मुंबईनाका येथील रेम्बो हॉस्पिटल येथे तिला दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.२९) तिच्या प्रकृर्तीत बिघाड झाल्याने कुटूंबियांनी जिल्हारूग्णालयात हलविले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.