रिक्षा चालकास प्रवाशाने केली मारहाण; १५ हजाराचे ऐवजही लुटले
नाशिक : रिक्षाप्रवासात चालकास मारहाण करीत प्रवाशाने लुटमार केल्याची घटना पेठरोड भागात घडली. या घटनेत रोकडसह सोनसाखळी भामट्याने बळजबरीने हिसकावून पोबारा केला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू शिवराम खोलमकर (५६ रा. म्हसरूळ) या रिक्षाचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खोलमकर शनिवारी (दि.२८) सायंकाळी पेठरोड भागातील रिक्षा थांब्यावर प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना एक अनोळखी तरूण तेथे आला.रोहिणीनगर येथे जायचे असल्याचे सांगितल्याने खोलमकर प्रवाश्यास आपल्या अॅटोरिक्षात बसवून प्रवासाला लागले असता ही घटना घटना घडली. शनिमंदिर मार्गे ते प्रवाश्यास घेवून जात असतांना मनपा गार्डनच्या कच्या रस्त्यावर पाठीमागे बसलेल्या प्रवाश्याने दमदाटी करीत रिक्षा थांबविण्यास भाग पाडले. यावेळी संशयीताने शिवीगाळ करीत चालकास मारहाण केली. तसेच खोलमकर यांच्या खिशातील साडे तीनशे रूपये आणि गळयातील सोनसाखळी असा सुमारे १५ हजार ३५० रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. यावेळी त्याने पोलीसात गेला तर तुला पाहून घेईन अशी धमकी देत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.
तडीपारीला अटक
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे तडीपारीची कारवाई केलेली असतांना राजरोसपणे शहरात वावरणा-या सराईतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत भारतनगर भागात मिळून आला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू पप्पू अन्सारी उर्फ सोहेल (३१ रा.भारतनगर झोपडपट्टी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बाबू अन्सारी उर्फ सोहेल या सराईताच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने त्यास शहर पोलीसांनी दोन वर्षांसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. रविवारी (दि.२९) तो भारतनगर भागात आला असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने सापळा लावण्यात आला होता. मदरसा समोरील मार्गावर तो पोलीसांच्या जाळय़ात अडकला. याप्रकरणी पोलीस शिपाई पानवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.