विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; मद्यधुंद अवस्थेत नातेवाईकांना शिवीगाळ, मारहाण
नाशिक – विनयभंगाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागाने नातलगाने मद्यधुंद अवस्थेत नातेवाईकांना शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिल्याची घटना अश्वमेध नगर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी अर्चना नितीन जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित पंकज संजय सावंत यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, अर्चना जाधव यांच्या मावशीचा जावई पंकज सावंत याने जाधव यांच्या बहिणीचा विनयभंग केला. राग अनावर झाल्याने संशय पंकज सावंत याने मद्यधुंद अवस्थेत अर्चना जाधव यांच्या घरात घुसला. त्याने अर्चना जाधव यांच्या आई, मावशी व बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यात अर्चना जाधव जखमी झाल्या. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.
सराफ बाजारातून दुचाकी लंपास
दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना हरिओम ज्वेलर्ससमोर, सराफ बाजार येथे घडली. याप्रकरणी राजेंद्र दगू आहेर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेंद्र आहेर यांनी दुकानासमोर दुचाकी पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार आव्हाड करत आहेत.