गॅलरीत खेळत असतांना इमारतीच्या सहाव्या
मजल्यावरून पडल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु
नाशिक : गॅलरीत खेळत असतांना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाला. ही घटना आगर टाकळी मार्गावर घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आरव सचिन चवरे (रा.ड्रिमसिटी मॅगो बिल्डींग,पोतदार शाळे मागे) असे मृत बालकाचे नाव आहे. आरव चवरे हा बालक शुक्रवारी (दि.२७) रात्री आपल्या घरातील गॅलरीत खेळत असतांना ही घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून तो जमिनीवर कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक दावले करीत आहेत.
सातपूरला महिलेची आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील केवल पार्क भागात राहणा-या २२ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री सागर मोकळ (रा.गोविंद चाळ,केवल पार्क) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. मोकळ यांनी शुक्रवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.