रासबिहारी लिंक रोड भागात व्यावसायीक स्पर्धेतून खून; आरोपी गजाआड
नाशिक : खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यावसायीक स्पर्धेतून एकाने दुस-या व्यावसायीकावर चाकू हल्ला करुन खून केल्याची घटना रासबिहारी लिंक रोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. आकाश मुन्ना काळे (रा.मते मळा,त्रिकोणी बंगल्यामागे पंचवटी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी तुषार रघूनाथ काळे (रा. शिवपुष्पा सोसा.मानेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार यांचे रासबिहारी लिंकरोडवरील कळसकरनगर भागातील मते मळा परिसरात चहा आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. व्यावसायीक स्पर्धेतून ही घटना घडली. गुरूवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास तुषार काळे आपल्या व्यवसाय सांभाळत असतांना आकाश काळे तेथे आला. त्याने मी कमी भावात खाद्यपदार्थ विक्री करतो त्यामुळे तू माझी बदनामी करतो काय या कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या आकाशने तुषारच्या पायाच्या मांडीवर चाकू हल्ला केला. या घटनेत तुषार काळे जखमी झाला , उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी आकाश काळे यास अटक केली असून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.
गॅसच्या स्फोटात महिला ठार
नाशिक : स्वयंपाक करीत असतांना अचानक गॅसचा स्फोट झाल्याची घटना सातपूर परिसरात घडली. या घटनेत महिला गंभीर भाजली होती. उपचारा सुरू असतांना तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मंगला संतोष डावरे (रा.सातपूर,नाशिक) असे गॅसच्या स्फोटात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगला डावरे या गेल्या शनिवारी (दि.२१) आपल्या घरात स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक गॅसचा स्फोट झाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना गुरूवारी (दि.२६) त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.