पुणे – नाशिक बसप्रवासात महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिणे चोरीला
नाशिक : पुणे नाशिक बसप्रवासात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारला. हा प्रकार महिला घरी पोहचल्यानंतर समोर आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता विजय गवळी (रा.गजानन कॉलनी,रासबिहारी लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अनिता गवळी या पुणे येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. बुधवारी (दि.२५) रात्री त्या परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पुणे नाशिक बसप्रवास करीत असतांना आसनावरील कॅरीत ठेवलेल्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी सुमारे ५३ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
नाशिक : चाकूचा धाक दाखवित टोळक्याने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जेहान सर्कल भागात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणा-या तीघांना अटक केली आहे. विशाल रामभाऊ कदम (रा.एमआयडीसी घरकुल,चुंचाळे शिवार),किसन तुकाराम वाघमारे (रा.दत्तनगर,चुंचाळे शिवार) व नजिर मदार शेख (रा. दत्तनगर,चुंचाळे शिवार) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी तोताराम स्वरूप पाल (रा.गणेशवाडी,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. तोताराम पाल बुधवारी (दि.२५) रात्री गंगापूररोडवरील जेहाण सर्कल भागात गेले होते. यावेळी संशयीत त्रिकुटाने त्यांना गाठून पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करीत तसेच चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.