नाशिक – पंचवटीत ३ लाख २६ हजाराचा गांजाचा साठा जप्त
नाशिक : राहत्या घरात गांजा या अमली पदार्थाचा साठा करणा-या एकास पोलीसांनी अटक केली. विक्री करण्यासाठी संशयीताने हा साठा केल्याचे समोर आले असून, पोलीसांनी सुमारे ३ लाख २६ हजार २५० रूपये किमतीचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदिशसिंह जागिरसिंह संधू (३९ रा.शाम दर्शन अपा.भगवतीनगर) असे अमली पदार्थाचा साठा बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीताने आपल्या राहत्या घरात गांजाचा साठा केल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी (दि.२६) छापा टाकला असता घरात ३ लाख २६ हजार २५० रूपये किमतीचा गांजाचा साठा मिळून आला. पोलीसांनी संशयीतास अटक करीत गांजाचा साठा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी विलास चारोस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
नाशिक : चाकूचा धाक दाखवित टोळक्याने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जेहान सर्कल भागात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणा-या तीघांना अटक केली आहे. विशाल रामभाऊ कदम (रा.एमआयडीसी घरकुल,चुंचाळे शिवार),किसन तुकाराम वाघमारे (रा.दत्तनगर,चुंचाळे शिवार) व नजिर मदार शेख (रा. दत्तनगर,चुंचाळे शिवार) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी तोताराम स्वरूप पाल (रा.गणेशवाडी,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. तोताराम पाल बुधवारी (दि.२५) रात्री गंगापूररोडवरील जेहाण सर्कल भागात गेले होते. यावेळी संशयीत त्रिकुटाने त्यांना गाठून पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करीत तसेच चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.