औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून अडीच लाखाचा ऐवज चोरीला
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याचा टेरेसचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा दीपेश चंग्राणी (रा.महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चंग्राणी यांचा औद्योगिक वसाहतीत जे.एम.नावाची कंपनी आहे. २ ते ४ मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद कपंनीच्या टेरिसवरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी कारखान्यातील टूल गेजस इन्स्टूमेंटस, कागदपत्रांची फाईल व चेक वॉल असा सुमारे २ लाख ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
…..
रस्त्यावर दोघा मित्रांना अडवून टोळक्याने लुटले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या दोघा मित्रांना अडवून टोळक्याने मारहाण करीत लुटल्याची घटना महामार्गावरील सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेत लुटारू टोळक्याने दहा हजाराची रोकड लांबविली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण धुराजी वाकळे (२१ रा.रंगरेजमळा,कलानगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाकळे व विकास अंकुश सोनवणे हे दोघे मित्र सोमवारी (दि.३) महामार्गाच्या सर्व्हिस रोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. अविष्कार हॉटेल समोरून दोघे मित्र जात असतांना पाठीमागून अचानक आलेल्या तिघांपैकी एकाने वाकळे यांना धक्का देवून जमिनीवर पाडले. याच वेळी दुस-याने त्याच्या खिशातील रक्कम बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत दोघांच्या खिशातील ९ हजार ८०० रूपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
……