महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज आणि व्हिडीओ पाठवणे पडले महागात; गुन्हा दाखल
नाशिक : महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज आणि व्हिडीओ पाठविणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताराम रामभाऊ सांगळे (रा.सावतानगर,सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. गंगापूररोड भागातील पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी संशयीताने तिच्या मोबाईलवर संपर्क साधून हे कृत्य केले. १२ ते २४ ऑगष्ट दरम्यान संशयीताने वेळोवेळी मोबाईलवर ७०० ते ८०० अश्लिल संदेश पाठविले. तसेच युट्युब क्लिप पाठविल्याने महिलेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी या घटनेची दखल घेत विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
प्रवासी तरूणास लुटले
नाशिक : प्रवासी तरूणास टोळक्याने मारहाण करीत लुटल्याची घटना द्वारका भागात घडली. या घटनेत तरूणाच्या खिशातील चार हजाराची रक्कम बळजबरीने काढून भामट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी रिक्षाचालकासह चार जणांविरूध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोहेब शफी शहा फकिर (२३ रा.चांदणी चौक,ओझर मिग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. फकिर सोमवारी (दि.२३) कामानिमित्त शहरात आले होते. रात्री परतीच्या प्रवासासाठी ते द्वारका बस थांब्यावर प्रवासी वाहनाची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. एमएच १५ एफयू ३८८८ या अॅटोरिक्षामधून आलेल्या चार जणांनी कुठे जायचे असे विचारून फकिर यांना रिक्षात बसवले. यानंतर त्यांना जाकिर हुसेन दवाखाना नजीकच्या ब्रीज खालील अंधारात नेवून सहप्रवास्यांसह चालकाने फकिर यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील चार हजाराची रक्कम बळजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.
पाथर्डी फाटा भागात एकाची आत्महत्या
नाशिक : पाथर्डी फाटा भागातील आनंदनगर येथे राहणा-या ३१ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निलेश गौतम भालेराव (रा.व्यंकटेश अपा.आनंदनगर) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. निलेश भालेराव याने मंगळवारी (दि.२४) आपल्या राहत्या घरातील स्लॅबच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत गौतम भालेराव यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.