कुत्र्याला लाथ मारल्याने एकास मारहाण; पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : कुत्र्याला लाथ मारल्याने एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सावतामाळी नगर भागात घडली. या घटनेत युवकाच्या डोक्यात हातातील कडे मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून,पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम दत्तात्रेय मलकापुरे (रा.गोलवाडा,सरदार चौक) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी शामनंददास नंदरामदास बैरागी (१९ रा.साक्षी गोपाल मंदिर तपोवन) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. बैरागी सोमवारी (दि.२३) सावता माळी नगर भागात गेला होता. अनिल पेठकर यांच्या दुकानासमोरून तो पायी जात असतांना ही घटना घडली. मलकापुरे यांचा कुत्रा अंगावर धावल्याने बैरागी यांने लाथ मारली असता संतप्त मलकापुरे याने त्यास मारहाण केली. दीड लाख रूपये किमतीचा कुत्रा आहे. तू कुत्र्याला लाथ का मारली असा जाब विचारत संशयीताने बैरागी यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत मलकापुरे याने हातातील लोखंडी कडे बैरागी यांच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.
प्रवासात महिलेचे पाकिट चोरी
नाशिक : बसप्रवासात महिलेच्या पर्स मधील पाकिट भामट्या महिलांनी चोरून नेल्याची घटना द्वारका भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलीमा शरद यशवंते (रा.डीजीपीनगर,आंबेडकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यशवंते मंगळवारी (दि.२४) येवला येथून नाशिकच्या दिशेने बस प्रवास करीत असतांना ही घटना घडली. द्वारका बस थांब्यावर त्या बसमधून उतरत असतांना सहप्रवासी असलेल्या दोन महिलांनी उतरतांना गदी असल्याची संधी साधत पर्स मधील पाकिटावर डल्ला मारला. पाकिटात पाच हजाराच्या रोकडसह घड्याळ व महत्वाची कागदपत्र असा सुमारे साडे पाच हजार रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
पाच जुगारी जेरबंद
नाशिक : वाड्याच्या छतावर बसून उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जणांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश जामघरे,भुषण देशमुख,अविनाश टिळे, दत्ता मोकळ व उज्वल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. पाथरवट लेन येथील एका वाड्याच्या छतावर काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी जामघरे वाड्याचे छत गाठले असता संशयीत जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अंबादास केदार यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक डी.पी.नाईक करीत आहेत.