पाच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : बसमध्ये चढत असतांना महिलेच्या पर्समधील दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना जुने सिबीएस बसस्थानक आवारात घडली. पर्स मध्ये सुमारे पाच लाख रूपये किमतीचे अलंकार होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जयाशंकर त्रिपाठी (रा.फडकेवाडा,त्र्यंबकेश्वर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्रिपाठी दांम्पत्य रविवारी (दि.२२) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी बसस्थानकात आले असता ही घटना घडली. त्र्यंबक बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत महिलेच्या पर्स मधील पाकिट चोरट्यांनी चोरून नेले. या पाकिटात सोन्याचे मंगळसुत्र, कानातील रिंगा व झुबे आणि बांगड्या असा पाच लाख रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याची पोत ओरबडले
नाशिक : मुलीला शिकवणीला सोडून रस्त्याने घराकडे पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील दामोदरनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता प्रविण सोनवणे (रा.संस्कार प्लाझा,दामोदर नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे या गेल्या सोमवारी (दि.९) परिसरात मुलीला शिकवणीसाठी सोडण्यासाठी गेल्या होत्या. मुलीस सोडून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात असतांना सुकन हाईटस इमारतीसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
महिलेची पर्स चोरीला
नाशिक : पार्क केलेल्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी महिलेची पर्स चोरून नेली. पर्समध्ये दोन मोबाईल आणि महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता प्रतिक जोशी (रा.श्रीरंग अपा.जाखडीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जोशी सोमवारी (दि.२३) पांडवलेणी भागात गेल्या होत्या. फाळके स्मारक परिसरात त्यांनी आपली कार (एमएच १५ सीएम ८५६५) पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारची खिडकीची काच फोडून शिटावर ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्स मध्ये दोन मोबाईल आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे १८ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.