राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक
नाशिक – नाशिक रोडला परिवार हॉटेल जवळ लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. नदीम सलीम बेग (वय २२, विहीतगाव, दीपक अशोक पताडे (वय १९) शुभम दिलीप घोटेकर (वय १८ दोघेही विहीतगाव) अशी संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (ता.२०) रात्री साडे नउच्या सुमारास परिवार हॉटेल समोर लॉजच्या शोधात असलेल्या राजस्थान येथील संतोषकुमार अर्जुनलाल मिना (वय २६, बसवा, जि.दौसा ) यांना संशयित नदीम बेग याने गाठले व त्यांना लॉज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याला दुचाकी (एमएच १५ सीई ४५१९) हिच्यावर बसवून विहीतगावला विठ्ठल मंदीर परिसरात नेले तेथे जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या खिशातून पाकीट जबरदस्तीने काढून घेत, शिवीगाळ
केली.तसेच रोख २२०० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे.
सिडकोत महिलेचे मंगळसूत्र चोरले
नाशिक – ठक्कर बाजार ते माणिकनगर (सिडको) दरम्यानच्या प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी चोरली. प्रतिभा आनंदसिंग ठाकरे (वय ३६, तिरुमाला प्लाझा, माणिकनगर) असे पीडित महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी एकच्या सुमारास त्या ठक्कर बाजार येथून सिडकोत माणिकनगरला रिक्षातून जात असतांना चोरट्यांनी कधीतरी त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅमची सोन्याची पोत चोरली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.