मद्यसेवन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून कोयत्याने हल्ला
नाशिक : मद्यसेवन करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून परिचीताने कोयत्याने हल्ला करीत तरूणाचा अंगठा छाटल्याची घटना पाथर्डीगावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना शेख (रा.पाथर्डी ) असे दारूसाठी हल्ला करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सागर भास्कर पवार (२८ रा.नवले यांच्या पिठ गिरणीमागे पाथर्डीगाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सागर पवार गेल्या रविवारी (दि.१५) तलाठी कार्यालयाजवळी भाजी दुकानासमोरून जात असतांना संशयीताने त्यास गाठले. यावेळी दारू पिण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. मात्र सागर पवार याने पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयीताने शिवीगाळ करीत कमरेला लावलेला धारदार कोयता काढून सागरवर हल्ला केला. या घटनेत कोयत्याचा वार हातावर झेलत असतांना त्यांचा अंगठा तुटला असून जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.
हातातील मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : रस्त्याने बोलत जाणा-या इसमाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कॉलेजरोड भागातील विसेमळा येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत. उमेश बाळकृष्ण कान्हाव (रा.बॉईज टाऊन स्कूल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. कान्हाव गुरूवारी (दि.१९) विसेमळा भागात गेले होते. मालपाणी हॉस्पिटल समोरून ते पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत ते रस्त्याने जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.