वीज मिटरमध्ये छेडछाड, दोन लाखाची चोरी; तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक : एकाच ठिकाणी राहणा-या तीन ग्राहकांकडून विज चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीत वीज मिटरमध्ये छेडछाड करून सुमारे दोन वर्षापासून वीज चोरी करीत होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूख पठाण,शकील शेख व हाजीरा शेख (रा.सानिया हाऊस,अजमेरी कॉलनी वडाळागाव) अशी संशयीत वीज चोरी करणा-या ग्राहकांची नावे आहेत. वीज वितरण कंपनीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ही बाब समोर आली असून, संशयीत गेल्या २६ महिन्यांपासून वीज चोरी करीत होते. फ्लॅश कंपनीच्या वीज मिटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्यात येत होती. संशयीतांनी महावितरणचे ८ हजार ४११ युनिटचे सुमारे १ लाख ९२ हजार १७० रूपयांचे नुकसान केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
….
वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी केली आत्महत्या
नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शुक्रवारी (दि.२०) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यात एका विवाहीतेचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मखमलाबाद रोड भागातील सविता प्रदिप ढुमणे (४५ रा.दौलत बंगला,स्वामी जनार्दन नगर) यांनी शुक्रवारी आपल्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. दुसरी घटना वडाळागावात घडली. सादिकनगर भागात राहणारे रशिद बशीर मोमीन (४५) यांनी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्याना मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाळदे करीत आहेत.