कारखाना व्यवस्थापकासह एकाने मजूरास केली बेदम मारहाण
नाशिक : कारखाना व्यवस्थापकासह एकाने मजूरास बेदम मारहाण केल्याची घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत मजूर जखमी झाला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमशुद्दीन बाबू जलालुद्दीन शेख (४४ रा.द्वारका) या मजूराने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांनी सुजाल इंडस्ट्रीज या कारखान्यात मजूरीचे काम केले होते. गेल्या गुरूवारी (दि.१९) ते आपल्या मजूरीचे पैसे घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. व्यवस्थापक राऊत आणि संतोष यादव नामक त्यांच्या साथीदाराने शेख यांना बेदम मारहाण केली. पैश्यांची मागणी करताच संतप्त दोघांनी शेख यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी यादव नामक संशयीताने अॅल्युमिनीअमच्या रॉडने मारहाण केल्याने शेख यांचा हाताचा अंगठा फॅक्चर झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत.
पाय घसरून विहीरीत पडल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक : शेतकाम करीत असतांना पाय घसरून विहीरीत पडल्याने महिलेचा मृत्यु झाला. ही घटना औरंगाबाद रोडवरील शिंदे मळा भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मंगला गंगाधर शिंदे (५६ रा.सेवा सोसायटी शेजारी, शिंदे मळा) असे विहीरीत पडल्याने मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगला शिंदे या गुरूवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत असतांना ही घटना घडली. विहीरीजवळ शेतकाम करीत असतांना अचानक पाय घसरल्याने त्या विहीरीत पडल्या होत्या. पाण्यात तरंगतांना आढळून आल्याने कुटूंबियांनी त्यांना विहीरीबाहेर काढले असता त्या मृतअवस्थेत मिळून आल्या अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.
…..