तीन महिलांच्या खात्यातून अशी लांबविली एक लाख दहा हजार रूपयांची रक्कम
नाशिक : नातेवाईकाने भाडे तत्वावर दिलेल्या घराचे डिपॉझिट आपल्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितल्याची बतावणी करीत भामट्याने एका महिलेसह तिच्या दोन मैत्रीणींच्या बँक खात्यातून रोकड लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत पेटीएम क्यु आर कोड, फोन पे आणि गुगल पे चा वापर करून एक लाख दहा हजार रूपयांची रक्कम परस्पर लांबविण्यात आली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल कुमार नामक नाव धारण केलेल्या भामट्याने हा ऑनलाईन डल्ला मारला आहे. गेल्या सोमवारी (दि.९) संशयीताने एका महिलेशी संपर्क साधला होता. यावेळी नातेवाईक असलेल्या संजीव पटेल यांचा फ्लॅट भाडेतत्वावर घेतला असून त्यांनी डिपॉझिट तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितल्याची बतावणी केली. त्यामुळे महिलेने आपला पेटीएमचा क्यु आर कोड भामट्यास पाठविला. यानंतर पुन्हा त्याने संपर्क साधून क्युआर कोड द्वारे पैसे वर्ग होत नसल्याचे सांगून महिलेच्या दोन महिलेंच्या बँक खात्याची माहिती जाणून घेतली. पेटीएम, फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून तीनही महिलांच्या बँक खात्याची माहिती मिळवित भामट्याने हा डल्ला मारला असून तिघींच्या खात्यातील एक लाख १० हजार रूपयांच्या रक्कमेवर ऑनलाईन डल्ला मारला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवार पेठेतील सागर प्रल्हाद हिरे (रा.सुंदर नारायण मंदिरामागे) यांची एमएच ४१ डब्ल्यू ८८२९ ही डिस्कव्हर दुचाकी गेल्या २३ जुलै रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत. दुसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. पळसे येथील किरण तानाजी शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंदे गेल्या रविवारी अरिंगळे मळा भागात आपल्या मित्राकडे गेले होते. नित्यानंद सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली एमएच १५ एफई ७१२५ पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.