नाशिक : टोलनाक्यावर हाणामारी करणे तृतीयपंथीयासह वाहनधारकांना चांगलीच महागात पडली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची पोलीसांनी दखल घेतल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोलनाका अधिका-याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आयेशा शुभांगी गुरु, स्नेहल शुभांगी गुरु, शिल्पा व त्यांचा साथीदार तसेच प्रवासी सोपान पानसरे आणि अमोल ढेरिंगे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे येथे मंगळवारी (दि.१७) टोलनाक्यावर ही घटना घडली होती. तृतीयपंथी आणि काही वाहनधारक यांच्यामध्ये पैसे मागण्यावरून हमरीतुमरी होऊन तुफान हाणामारीचा प्रकार घडला होता. वाटसरूंनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याने चर्चेस उधाण आले होते. या घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेतली. मात्र तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे या हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. टोलनाका अधिकारी समाधान गायके यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरिल संशयीतांविरोधात भादवि कलम १६०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.