नाशिक : वडाळागावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीसांनी दोन्ही गटातील चौघांना अटक केली आहे. दानिश रौफ शेख,शौकत सुपडू शहा, अजय रायकर आणि बंटी उर्फ अकिल पीर मोहम्मद शेख (रा.सर्व वडाळागाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. तर या घटनेत सलिम रोशन शेख आणि हुसेन पीर मोहम्मद शेख हे दोघे जखमी झाले आहेत. माळीगल्लीतील हुसेन शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,दानिश रौफ शेख,रौफ शेख,सलिम शेख आणि नईम शेख आदींना मंगळवारी (दि.१७) शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने तलवारीने हल्ला केला. या वादात दानिश शेख याने भाऊ बंटी याच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रारदार हुसेन शेख यांनी तलवारीचा वार हातावर झेलल्याने ते जखमी झाले असल्याचे म्हटले आहे तर सलिम शेख (रा.संजेरी मार्ग) यांने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हुसेन शेख, शौकत शहा,अजय रायकर,बंटी उर्फ अकिल शेख आदींनी आपले घर गाठून ओम काजळे आणि सद्दाम यांच्या वादात सद्दामची बाजू का घेतला या कारणातून शिवीगाळ करीत टोळक्याने वाद घातला. यावेळी संतप्त टोळक्याने तुझा बेत पाहतो अशी धमकी देत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत हुसेन शेख याने धारदार हत्याराने तर शौकत शहा याने लोखंडी रॉड मारल्याने सलिम शेख जखमी झाले असून याप्रकरणी परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक हादगे व पाळदे करीत आहेत.