इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या सात विद्यार्थ्यांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल
नाशिक : मित्राच्या मृत्युप्रकरणी इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या सात विद्यार्थ्यांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून, मृत युवकाच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋचा भारती (रा.खडकी जि.अकोला),नमित मिश्रा (रा.पवई मुंबई), दीपककुमार झा ,ऋषभराज सिन्हा (रा.दोघे बिहार),लक्ष जस्वाल (रा.छत्तीसगड),मोनिका वळवी (रा.भवानीपाडा जि.नंदूरबार) व ऋषीकेश दराडे (रा.आडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. प्रमिला महानकर (रा.उमरी जि.अकोला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे. संदिप फाऊंडेशन या संस्थेत शिक्षण संस्थेत इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या अंकित दिनकर महानकर (२१ रा.साई गार्डन सोसा.गुलमोहर कॉलनी,सातपूर) या युवकाचा १५ मार्च २०२० रोजी मृत्यु झाला होता. संशयीत मित्र मैत्रिणींनी त्यास व्यसनाधिन होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. व्यसन करण्यास नकार देणा-या अंकितशी संबधीतांनी वेळोवेळी वाद घालून तसेच जीवे मारण्याची धमकी देवून व्यसनाधीन होण्यास प्रवृत्त केले. तसेच त्याचा खून केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी दाद न दिल्याने मृत अंकितची आई प्रमिला महानकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करीत आहेत.
…..