नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका बंगाली भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुजेच्या बहाण्याने हा प्रकार घडला असून, बाबासह त्याच्या दोन साथीदारांना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बलत्कार,विनयभंगासह महाराष्ट्र नरबळी व अघोपी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामिल गुलाम यासिन शेख (२९ मुळ रा.पश्चिम बंगाल, हल्ली पठाडे गल्ली गंगापूरगाव), स्टॅलीस्टींग उर्फ शिवराम जेम्स फर्नांडीस (५६ रा. वैष्णवी अपा.कमलनगर,कामठवाडा) व अशोक नामदेव भुजबळ (६३ रा.चामुंडेश्वरी रो हाऊस,राधाकृष्णनगर सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून, कामिल शेख भोंदू बाबा आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. मुळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला कामिल शेख गंगापूर गावातील जामा मस्जीद समोरील एका पत्र्याच्या रूममध्ये गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. आयुर्वेद आणि जादूटोण्याच्या माध्यमातून त्याने या भागात भोंदूगीरी सुरू केली असल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखीला अनेक जण त्यास बळी पडले असून, बंगाली विद्या प्राप्त असल्याचे सांगून तो गंडवित आहे. गेल्या वर्षी दोघा संशयीतांच्या माध्यमातून पीडिता भोंदूबाबाच्या संपर्कात आली होती. बाबाने दोघांपैकी एकास पैसे पाडण्याचे आमिष दाखविल्याने पूजेसाठी महिलेची निवड करण्यात आली होती. १३ डिसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ या दरम्यान दर बुधवारी महिलेस बाबाच्या घरी बोलावून बलात्कार करण्यात आला. अन्य दोघा संशयीतांच्या मदतीने पत्र्याच्या घरात खोटी पूजा मांडून हा प्रकार घडला असून महिलेवर तीन वेळा बळजबरीने बलात्कार करण्यात आला. यावेळी अंगावरून नारळ उतरवून बाबाने हे कृत्य केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत.