पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी; पैसे अन् दानपेटीही पळवली
मंदिरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने रोकडसह दानपेटी लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१५) मध्यरात्री २ वाजता पंचमुखी हनुमान मंदिर, जुना आडगाव नाका, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी महंत भक्तीचरण दास यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लोखंडी दानपेटी, रोकड लंपास केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पंचमुखी हनुमान मंदिरात कोणी नसल्याची खात्री चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने मुर्तीसमोर ठेवलेली लोखंडी दानपेटी व रोकड लंपास केली. महंत भक्तीचरण दास हे मंदिरात आले असता त्यांना दानपेटी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. पाटील करत आहेत.
घरात घुसून महिलेला शिवीगाळ, मारहाण
घरात घुसून एका दाम्पत्याने महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित सुमीत सुरेश सोनार, सुनिता सुरेश सोनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला घरामध्ये स्वयपाक करत होती. त्यावेळी संशयित सोनार दाम्पत्य महिलेच्या घराजवळ आले. तू आमच्या घरात कशी काय आली, असे म्हणत संशयित दोघांनी महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव करत आहेत.
जेलरोडला दुचाकी लंपास
दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना भगवती सोसायटी गेटसमोर, जेलरोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी आनंद विठ्ठल जोरवेकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद जोरवेकर यांनी दुचाकी भगवती सोसायटीसमोर पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी व लॅपटॉप लंपास केला. पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. घुगे करत आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१५) दुपारी दीड वाजता शक्तीनगर, हिरावाडी, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र मुरलीधर वाघ (वय ४९, रा.शक्ती सोसायटी, शक्तीनगर, हिरावाडी, पंचवटी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नरेंद्र वाघ यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही बाब त्यांचे मित्र हेमंत कापुरे यांना समजली. त्यांनी उपचारार्थ वाघ यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार डी. एम. वनवे करत आहेत.
पादचार्याचा मोबाईल हिसकावला
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने एकाच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची घटना नागजी चौक, वडाळा रोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी सहेबाज इकबाल शेख (वय २८, रा. हरसूल, ता.त्र्यंबकेश्वर) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सहेबाज शेख नागजी चौकाकडून उस्मानिया चौकाकडे पायी जात होते. त्यावेळी विनाक्रमांक दुचाकीवरुन दोघे त्यांच्या जवळ आले. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने शेख यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. शेख यांनी आरडाओरड केली असता दुचाकीवरुन चोरटे फरार झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.