पंचायत समिती ग्रामिण विकास यंत्रणा कार्यालयातील संगणक चोरीला; सीसीटिव्हीमध्ये घटना कैद
नाशिक : पंचायत समिती आवारातील ग्रामिण विकास यंत्रणा कार्यालय फोडून चोरट्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा संगणक चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुजीतकुमार कुलकर्णी (रा.त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी ग्रामिण विकास यंत्रणा कार्यालयात कार्यरत आहे. दि.१८ जुलै रोजी ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्र्यंबकरोडवरील पंचायत समिती आवारातील प्रधान मंत्री आवास योजना कार्यालयातील संगणक ऑपरेटर कक्षाच्या दरवाजाचे ग्रील वाकवून ही चोरी केली. कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी संगणकासह दोन सीसीटिव्ही कॅमेरे असा सुमारे २० हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून त्यात तीन चोरट्याने हे कार्यालय फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.
….
टोळक्याने कामगारास केली बेदम मारहाण
नाशिक : धारदार चाकूचा धाक दाखवित टोळक्याने कामगारास बेदम मारहाण केल्याची घटना कॅनोलरोडवरील हनुमाननगर भागात घडली. या घटनेत डोक्यात फरचीचा तुकडा मारल्याने कामगार जखमी झाला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी एकास बेड्या ठोकल्या असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना समज देवून पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. शुभम योगेश जगताप (१९ रा.स्वामी पुष्प अपा.ध्रुवनगर) असे संशयीताचे नाव आहे. तर त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याप्रकरणी संदिप दादा मोरे (रा.राजवाडा,गंगापूर गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. संदिप मोरे शुक्रवारी (दि.१३) आपल्या दुचाकीवर कामावर जात असतांना ही घटना घडली. कॅनोलरोडने प्रवास करीत असतांना हनुमान मंदिर भागात पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. यावेळी धारदार चाकूचा धाक दाखवत कुठलेही कारण नसतांना टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने डोक्यात फरचीचा तुकडा मारल्याने ते जखमी झाले असून,परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पोलीसांनी सशयीतास अटक केली आहे. या हाणामारीत तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असून संबधीताना ताब्यात घेत पोलीसानी समज देवून पालकांच्या स्वाधिन केले आहे. अधिक तपास हवालदार भडींगे करीत आहेत.
…..