नाशिक : हज यात्रेच्या बहाण्याने मुस्लीम भाविकांना कोट्यावधींचा गंडा घालणा-या जेहान इंटरनॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये पावणे चार कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असला असून तक्रारदारांची संख्या वाढल्यास हा आकडा फुगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतिन अजिज अहमद मनियार उर्फ कादरी (रा.रहेनुमा स्कूल,वडाळारोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुजम्मील युसूफ शेख (रा.मिरजनगर,नागजी चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवित्र हज आणि उमराह या धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी मुस्लीम बांधवाना स्वस्तातील यात्रेचे आमिष दाखवून संशयीताने हा गंडा घातला आहे. वडाळा रोड येथील रहेनुमा स्कूल परिसरात ऑफिस थाटून हा उद्योग केला. संशयीताच्या आमिषाला बळी पडून सन. २०१४ मध्ये तक्रारदार शेख यांनी त्याच्याशी संपर्क केला होता. यावेळी स्वस्तातील पॅकेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तक्रारदार शेख यांनी आपल्या नातेवाईकांसह आप्तेष्टांनाही या योजनेत भाग घेण्यास प्रवृत्त केले. शेख यांच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी ७१ लाख ५८ हजार ४०० रूपयांची तसेच नसरीबाद येथील यात्रेसाठी २३ भाविकांनीही १ लाख १९ हजार रूपयांची बुकींग देण्यात आली. सदरची रक्कम रोख, धनादेश आणि ऑनलाईन माध्यमातून संशयीताने स्विकारली होती. मात्र सन. २०१८ पर्यंत संशयीताने भाविकांच्या यात्रेची व्यवस्था केली नाही. चार वर्ष उलटूनही यात्रा प्रवासाचे विमान तिकीट अथवा पासपोर्ट आणि तत्सम कामे मार्गी न लावल्याने फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. याच काळात संशयीतावर वेगवेगळया ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले तसेच संशयीताने गाशा गुंडाळल्याने शेख यांनी पोलीसात धाव घेतली होती. मात्र पोलीसांकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मुंबईनाका पोलीसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.