पेठरोडवरील जुगार अड्डा पोलीसांनी केला उद्ध्वस्त; ३६ जुगारींना अटक, एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक : पेठरोडवरील राहूलवाडी भागात राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा पोलीसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३६ जुगारींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ लाख ४ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ व मध्यवर्ती शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बाळू हिरे,मनोज बाळू हिरे (रा.दोघे राहूल वाडी,पेठरोड),सचिन हंसराज कातारी उर्फ खिच्ची (रा.फुलेनगर) आदीसह ३६ जुगारींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राहूलवाडी येथील लक्ष्मी गंगा निवास या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.११) छापा टाकला असता तिघा संशयीतांचा हा जुगार अड्डा असल्याचे समोर आले असून या ठिकाणी ३६ जुगारी जुगार खेळतांना मिळून आले. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी युनिट १ चे निरीक्षक आनंदा वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे करीत आहेत.
..
बेकायदा मद्यविक्री; पोलीसांनी ठोकल्या तिघा दारू विक्रेत्यांना बेड्या
नाशिक : सिडको भागात बेकायदा मद्यविक्री सुरू असून पोलीसांनी छापा सत्र राबवित तिघा दारू विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या. वेगवेगळया ठिकाणी केलेल्या या कारवाईत साडे सोळा हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडकोत देशी दारूची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलीसांनी गुरूवारी (दि.१२) वेगवेगळया भागात छापे टाकले. या कारवाईत सागर चंद्रकांत घुगे (रा.मोरवाडी गाव), रविंद्र देवचंद शितोळे (रा.दत्तचौक) व रोशन प्रतिक सांगळे (रा.विजयनगर) आदी बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आले. घुगे विजयनगर बस थांबा भागात मद्यविक्री करीत होता. त्याच्या ताब्यातून २ हजार ७९० रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा आणि टँगो पंच नावाचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंत रमाकांत आहेर यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत. तर दुसरी कारवाई दत्त चौकातील भाजी मार्केट मध्ये करण्यात आली. गाळा नं.८९ मध्ये संशयीत शितोळे आणि सांगळे परवाना नसतांना मद्यविक्री करतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ११ हजार ८५० रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा आणि टँगो पंच नावाचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राकेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
..